नवी दिल्ली : मुंबईत अण्णांच्या लोकपाल आंदोलनाचा फ्लॉप शो झाला. त्यानंतर अण्णा चळवळ थंड्या वस्त्यात असे अग्रलेखही आले, अनेकांनी अण्णांना आपापल्या परीने सल्ले द्यायला सुरूवात केली. अण्णा आता तरी सुधारा नाही तर काही खरं नाही. पण प्रत्यक्षात खरीच स्थिती आहे का? आम्ही घरोघर जाऊन लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर काय आलं हातात...
अण्णांचा मुंबईतील शो कथित अर्थाने जरी फ्लॉप झाला असला तरी, प्रत्यक्षात अण्णांना असलेला लोकांचा पाठिंबा तसूभरही कमी झालेला नाही. अजूनही अण्णा आणि त्याचं आंदोलनच आपल्याला प्रभावी सशक्त आणि लोकपाल मिळवून देऊ शकतील तसंच त्यांच्यामुळेच देशातला भ्रष्टाचार निपटून काढण्यास मदत होईल... असाही निष्कर्ष स्टार माझा - नेल्सन सर्वेक्षणातून उघड झाला.
अण्णाचं मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर आम्ही हे सर्वेक्षण केलं. भारतातील तब्बल 28 शहरांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणात अण्णा अजूनही देशवासियांचे खरे हिरो असल्याचंच आम्हाला दिसून आलं. म्हणजे अगदी उद्याच निवडणुका झाल्या तर देशाच्या राजकीय पटलावर काय चित्र असेल, असंही आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला. आमच्या गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या जनमत चाचण्यांच्या मालिकेतला आज जाहीर झालेलं सर्वेक्षण हे तिसरं सर्वेक्षण... वेगवेगळ्या टप्प्यावर आणि वेगवेगळ्या काळात आम्ही काही ठराविक प्रश्न घेऊन लोकांमध्ये गेलो, आणि त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी मे 2011 आणि ऑगस्ट 2011 मध्ये याच प्रकारचे सर्वेक्षण आम्ही केलं होतं. आता आज आलेला या मालिकेतला हा तिसरं सर्वेक्षण आहे. अर्थातच हे तिसरं सर्वेक्षण मुंबईतला अण्णांचा शो फ्लॉप झाल्यानंतर तसंच लोकपाल विधेयक संसदेत संमत झाल्यावर आणि राज्यसभेत त्यावर मतदान न होता गुंडाळलं गेल्यानंतर घेण्यात आलंय.
आम्ही जेव्हा मतदारांना थेट विचारलं की तुमचा अजूनही अण्णांचा पाठिंबा आहे का, कारण गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची लोकप्रियता घटतेय, तर आम्हाला मिळालेल्या प्रतिसादानंतर तब्बल 52 टक्के लोकांनी अजूनही अण्णांना आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. फक्त 42 टक्के लोकांना अण्णांची लोकप्रियता घटल्याचं वाटतं. तर अण्णांच्या मुंबईतील उपोषणाबद्धल 92 टक्के लोकांना माहिती असल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलं.
एवढंच नाही तर राज्यसभेत लोकपाल विधेयकावर मतदान न होता गुंडाळलं गेल्याला राजकारणीच जबाबदार असल्याचं 43 टक्के लोकांना वाटतं. तर 30 टक्के लोकांना राज्यसभेतल्या नामुष्कीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचं वाटतं. हेच तीस टक्के लोक विधेयक संमत होऊ शकलं नाही यासाठी काँग्रेसला जबाबदार धरतात.
आम्ही या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना विचारलं की टीम अण्णा ही खरोखरच हटवादी आणि हेकट आहे का? अण्णा हजारेंनी जरा नमतं घेत आपला हेतू साध्य करून घेतला पाहिजे का. तर तब्बल 59 टक्के लोकांना टीम अण्णा ही हेकट वाटत नाही. उलट त्यांनी अतिशय रिजीड पद्धतीने आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेतल्या पाहिजेत असंही त्यांना वाटतं. कारण सरकार त्याशिवाय त्यांना जुमानणार नाही. अशीही या 59 टक्के लोकांची भूमिका आहे, तर फक्त 36 टक्के लोकांना अण्णांनी थोडा नमतेपणा दाखवत सरकारबरोबर सातत्याने चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढायला हवा असं वाटतं.
अण्णांच्या आमरण उपोषणाविषयी आम्ही जेव्हा लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा असं आढळून आलं की तब्बल 71 टक्के लोकांना अण्णांनी लोकपाल विधेयक संमत होत तोवर आमरण उपोषण करावं असं वाटतं. या लोकांनी सरकारी लोकपालाच्या तुलनेत अण्णाचं लोकपाल अधिक संक्षम असल्याचंही मत व्यक्त केलं. तर आम्ही प्रश्न विचारलेल्या अनेकांनी सरकारी लोकपाल विधेयकही चांगलं असल्याचं मत व्यक्त करून सरकारी विधेयकाला पाठिंबा दर्शवला. 61 टक्के लोक सरकारी लोकपाल विधेयकाविषयी आशावादी असल्याचं सर्वेक्षणात उघड झालं.
लोकपाल विधेयकाला संसदेत संमत होण्यासाठी राजकारणी कितपत पाठिंबा देतील, असं विचारल्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिसून आली, 48 टक्के लोकांनी सांगितलं राजकारणी लोकपाल विधेयक संमत होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील तर 43 टक्के लोकांनी नेमकं यापेक्षा वेगळं मत व्यक्त केलं.
एकूणच जेव्हा भ्रष्टाचाराचा विषय निघतो, तेव्हा राजकारणी नेते आणि त्यांच्या पक्षाचे यांच्यावर त्यांचा स्वाभाविक रोष निघतो. या देशात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजण्यासाठी हे सर्वपक्षीय राजकारणीच जबाबदार असल्याचं तब्बल 67 टक्के लोकांना वाटतं. टीम अण्णा जरी प्रमुख सत्ताधारी पक्ष म्हणून फक्त काँग्रेसलाच भ्रष्टाचारासाठी जबाबदार धरत असली तरी फक्त 28 टक्के लोकांना देशातल्या भ्रष्टाचारासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचं वाटतं.
राहुल गांधी हे अलीकडच्या काळात एक लोकप्रिय युवा नेते म्हणून उदयाला आले आहेत. पण बहुसंख्य लोकांना अजूनही राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याची वेळ आलेली नसल्याचं वाटतं. टक्केवारीच्या भाषेत सांगायचं तर 58 टक्के लोकांना अजूनही राहुल गांधी पंतप्रधान म्हणून देशाची धुरा सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, असं वाटत नाही.
आम्ही ऑगस्ट महिन्यात जेव्हा अशाच प्रकारचं सर्वेक्षण केलं होतं. त्यावेळी राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी सक्षम असल्याचं मत 39 टक्के लोकांनी व्यक्त केलं होतं. आता मात्र त्या प्रमाणात बरीच घट झालीय. यावेळी फक्त 35 टक्के लोकांनी राहुल गांधीच्या पंतप्रधान होण्याला संमती दर्शवलीय. म्हणजेच राहुल गांधीच्या लोकप्रियतेत तब्बल चार टक्क्यांची घट झालीय.
बहुसंख्य म्हणजे 56 टक्के लोकांना असं वाटतं की सत्ताधारी काँग्रेसला अण्णा हजारेचं आंदोलन योग्य पद्धतीने हाताळता आलं नाही. अण्णाचं आंदोलन हाताळण्यात सरकारला आलेलं अपयश नेमकं कोणामुळे असं विचारल्यावर मात्र 57 टक्के लोक पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना क्लीन चीट देतात, त्यासाठी काँग्रेसच्या मंत्रिमंडळातले सहकारी जबाबदार असल्याचं वाटतं.
तसंच अगदी उद्याच निवडणुका झाल्या तर कुणाला मतदान कराल किंवा कोणत्या पक्षाकडे सत्तेची सूत्रे सोपवायला हवीत, असं विचारल्यावर मात्र भाजपला पसंती देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तब्बल 31 टक्के म्हणजे सर्वाधिक लोकांनी भाजपला पसंती दिलीय, तर काँग्रेसच्या बाजूने उभे राहणाऱ्यांची टक्केवारी फक्त 21 टक्के आहे.
स्टार माझा - नेल्सन यांनी हे सर्वेक्षण देशातल्या 28 शहरामध्ये केलं. त्यामध्ये महाराष्ट्राल्या मुंबईसह पाच प्रमुख शहरांचा समावेश होता. त्यामध्ये पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद अशी इतर शहरे आहेत. देशभरात या सर्वेक्षणात 8902 लोकांनी भाग घेतला. तर हे सर्वेक्षण 30 डिसेंबर 2011 ते एक जानेवारी 2012 या तीन दिवसात पार पडलं.
मुंबईतल्या कथित फ्लॉफ शो नंतरही अण्णांचा करिश्मा कायम, राजकारण्यांवरील रोषही वाढला : स्टार माझा - नेल्सन सर्वेक्षण







