मुंबई : बेताल वक्तव्य करणाऱ्या उत्तर भारतीय नेत्यांना काँग्रेसने आवर घालावा, नाहीतर महाराष्ट्रात दंगली पेटतील, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना दिलाय. 
आम्हाला आव्हान द्यालं, त्याचं क्षणी ‘चालते व्हा’ असंही राज ठाकरे यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या उत्तर भारतीय नेत्यांना उद्देशून म्हटलं आहे.
काँग्रेस खासदार संजय निरूपम आणि काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांना शिवसेनेनेच मोठं केलं, असा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय. काँग्रेस खासदार संजय निरूपम आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं साटंलोटं आहे, असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय.
मुंबई बंद पाडण्याचा विचारही मनात आणलात तर बेडरुममधून बाहेर पडून देणार नाही, असंही राज ठाकरेंनी खडसावलंय. यापुढे मराठी माणसाच्या विरोधात एक शब्दही बोलून दाखवा, असं थेट आव्हान राज यांनी कृपाशंकर सिंह आणि संजय निरुपम यांना दिलंय.
उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई ठप्प होऊ शकते असं वक्तव्य काँग्रेस खासदार संजय निरूपम यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात केलं होतं, त्यानंतर या वादाला सुरूवात झालीय. यावर मुंबई बंद पाडणाऱ्यांचे दात घशात घालू, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संजय निरूपम यांना दिला होता.







